सामाजिक
Trending

भिवंडी पंचायत समिती अंतर्गत “मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान” तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न.

भिवंडी दि.०६(प्रतिनिधी ): ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत जिल्हा स्तरावर दि.३ सप्टेंबर २०२५ रोजी “मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान” कार्यशाळा संपन्न होताच दि.०४ सप्टेंबर २०२५ रोजी पंचायत समिती भिवंडीच्या वतीने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा” भिवंडी येथील फरफान हॉल, मिल्लत नगर येथे आयोजित करण्यात आली होती,सदर कार्यशाळेस तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी,व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक, छायादेवी शिसोदे व ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, मुनिर बाचोटीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
भिवंडी तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांनी प्रास्ताविकेतून अभियानाबाबत मार्गदर्शन करतांना सांगितले कि,तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींनी ‘ मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानात’ सहभाग घ्यावा.तालुक्यात प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला १५ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास १२ लाख रुपये तर तृतीय क्रमांक पटकावल्यास ८ लाख रुपये बक्षीस मिळणार असल्याचे सांगितले. जिल्हा स्तरावर ५० लाख, विभागीय स्तरावर १ कोटी तर राज्य स्तरावर निवड झाल्यास तब्बल ५ कोटी रुपये बक्षीस मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद ठाणे , प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी मार्गदर्शन करतांना ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. त्रिस्तरीय पंचायत राज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे या अभियानाचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील विकासाच्या बहुतांश योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जात असल्याने ग्रामपंचायती व पंचायत समिती यांनी या योजना प्रभावीपणे राबवून त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवला पाहिजे. यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे, ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रामध्ये पंचायत राज संस्थांचा सहभाग वाढवून त्यांना गतिमान करणे हे “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” चे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून प्रोत्साहन देण्याकरिता पुरस्कार अभियान राबविण्यास शासनाने मान्यता दिल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामविस्तार अधिकारी इंद्रजित काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि,शासन निर्णयानुसार सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांबरोबरच अभिसरण, संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभागातून लोकचळवळ, नाविन्यपूर्ण उपक्रम अशा विविध मुद्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्वनिधी निर्मिती व लोकवर्गणीद्वारे ग्रामपंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, पाणीपुरवठा, जलसंधारण व पर्यावरण संवर्धन, शेततळे व घरकुल बांधकाम योजनेशी अभिसरण, ग्रामपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण आणि महिला बचतगट, शेतकरी व दुर्बल घटकांसाठी ठोस उपाययोजना यावर विशेष भर दिला पाहिजे असे सांगितले.
कार्यशाळेस विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) राजु भगवान भोसले व ग्रामपंचायत अधिकारी सुधाकर सोनावणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक पाटील यांनी केले या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीचा संकल्प करून कार्यशाळेत उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत तालुक्याचे गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांनी केले व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!