भिवंडी महसूल विभागाच्या छत्रछायेखाली भिवंडी तालुक्यातील दगड खाणींमध्ये ब्लास्टिंगचे स्फोट.पूर्वसूचना न मिळाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण.

(महेंद्र सोनावणे)
दि. १०-भिवंडी उपविभागीय अधिकारी(प्रांत) यांच्या विभागा अंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या दगडखाणींमध्ये दररोज होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांमध्ये भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे. देशात पाकिस्तानशी युद्धजन्य तणावाचं वातावरण निर्माण झाल्याने घरा जवळ ब्लास्टिंग होतंय कि बाॅम्ब फुटतोय अशी संभ्रम अवस्था निर्माण झाली असल्याने , भिवंडी महसूल प्रशासनाकडून नागरिकांना ब्लास्टिंग विषयी कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना दिली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होउन भिवंडी महसूल विभागाच्या बेजबाबदार प्रशासनाने नागरिक हादरून गेले आहेत.
दगडखाणीतून होणाऱ्या स्फोटांचे आवाज इतके तीव्र असतात की काही वेळा घरांची भिंत हादरते, खिडक्या थरथरतात, आणि लहान मुलं, वृद्ध यांचं मानसिक संतुलन ढासळतं. यामुळे गावांमध्ये पसरलेली भीती अधिक तीव्र होत चालली आहे.
नियमांनुसार दगड खाणीतील ब्लास्टिंग करण्यापूर्वी स्थानिक महसूल प्रशासन तलाठी ,मंडळ अधिकारी,ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ,सरपंच किंवा पोलीस पाटील यांना पुर्व सूचना द्याव्यात, अशी जबाबदारी असताना ती पूर्णतः पाळली जात नाही.स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी हे आपले हात ओले करण्यात धन्यता मानत आहेत,असा आरोप होत आहे.
नागरिकांनी अनेकदा महसूल व खनिकर्म विभागाकडे लेखी तक्रारी केल्या आहेत.मात्र या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने अधिका-यांच्या बैठका घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सतर्कतेने काळजी घेत आहेत.ठाणे जिल्हाधिकारी हे जिल्ह्यातील सर्व अधिकारी यांच्या सुरक्षिततेसाठी बैठक घेत आहेत.मात्र त्यांच्याच अधिकार क्षेत्रात येणाऱ्या भिवंडी उपविभागीय अधिकारी(प्रांत) अमित सानप यांच्या महसूल प्रशासन विभागा अंतर्गत येणारे दगड खाणींमध्ये होणारे ब्लास्टिंग हे का दुर्लक्षीत होत आहेत असा प्रश्न तालुक्यातील नागरिक विचारत आहेत.
एकीकडे महाराष्ट्रात सतर्कतेचे वातावरण तयार करण्यात येत आहे, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर नागरिकांच्या सुरक्षेची आणि मानसिक शांततेची कोणतीही काळजी घेतली जात नाही, हे अत्यंत निषेधार्ह आहे.असे संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
“आमच्या घराजवळ ब्लास्टिंग होतंय की बॉम्ब फुटतोय, याचंही भान राहात नाही.लहान मुलं, महिला, वयोवृद्ध व्यक्ती या भितीने झोपत नाही.भिवंडी महसूल विभागाचे प्रशासन हे दगडाचे प्रशासन आहे काय?असे भिवंडी तालुक्यातील नागरिकांची सार्वजनिक ठिकाणी राजरोसपणे चर्चा आहे.
या संदर्भात भिवंडी प्रांत कार्यालयाबरोबर संपर्क साधला असता तेथील नायब तहसीलदार चंद्रकांत रजपुत यांनी नम्रपणे सांगितले की, या बाबतीत आम्ही विचार केला नाही, परंतु साहेब आज ठाण्यात मिटिंगला आहेत, हा विषय साहेबांपर्यंत पोहचवला जाईल.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ जागे होऊन सर्व ब्लास्टिंग क्रिया नियमबद्ध कराव्यात व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.



